जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषदेत भाजपने अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांच्या पाठिंब्यावर बहुमत गाठले असले, तरी आता पक्षासमोर खरी राजकीय कसोटी उपनगराध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवक आणि विषय समिती सभापती निवडींची उभी राहिली आहे. प्रभाग क्र. ६ मधून भाजपकडून निवडून आलेले नगरसेवक विक्रम ताड यांची उपनगराध्यक्षपदी जवळपास निवड निश्चित मानली जात असून, स्वीकृत नगरसेवकपदासाठी माजी नगरसेवक परशुराम मोरे यांची की भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांची वर्णी लागते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपने नगरपरिषद निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासून इच्छुक असलेले माजी नगरसेवक परशुराम मोरे यांना निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यास प्रवृत्त केले होते. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ८ मधून आ. गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व खंदे समर्थक अतुल मोरे यांनाही निवडणूक लढवू नये, असे सांगण्यात आले होते. त्या बदल्यात परशुराम मोरे यांना गोंधळी समाज महामंडळावर किंवा स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचा, तसेच अतुल मोरे यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा शब्द दिला गेला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात परशुराम मोरे आणि चंद्रकांत उर्फ पापा कुंभार हीच दोन नावे आघाडीवर असल्याची चर्चा भाजपच्या गोटातून होत आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी संतोष मोटे, डॉ. प्रवीण वाघमोडे, विशाल प्रधान, सागर कोरे, सौ. अर्चना शेंडगे-पाटील, अतुल मोरे आदी नावे इच्छुकांत असली, तरी अंतिम निर्णय या दोघांपैकी एकाच्याच बाजूने झुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी विक्रम ताड, कुमार साळे आणि गौतम ऐवळे यांची नावे चर्चेत असली, तरी विक्रम ताड यांचे पारडे जड मानले जात आहे. पक्षांतर्गत समीकरणे आणि बहुमताची गणिते लक्षात घेता ताड यांची उपनगराध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.
जत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची, स्वीकृत नगरसेवकांची तसेच विषय समिती सभापतींची निवड उद्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या नगरपरिषद बैठकीत करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बैठकीत भाजप नेमका कोणता राजकीय निर्णय घेतो आणि कोणाची वर्णी लागते तर कोणाचा पत्ता कट होणार याकडे संपूर्ण जत शहराचे लक्ष लागले आहे.
आदाटे जॉकेश- 8007341168

