yuva MAharashtra विज्ञान प्रदर्शनात सांगली जिल्ह्यात शिक्षक श्रीकांत सोनार प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

विज्ञान प्रदर्शनात सांगली जिल्ह्यात शिक्षक श्रीकांत सोनार प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     शांतिनिकेतन, सांगली येथे संपन्न झालेल्या ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, काराजनगी (ता. जत) येथील शिक्षक श्रीकांत सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या घवघवीत यशामुळे त्यांची  नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून, ते या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
     जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे ही बाब केवळ काराजनगी शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जत तालुका व सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. विज्ञान विषयाच्या प्रभावी मांडणीबरोबरच नाविन्यपूर्ण प्रयोग, उपयुक्त संकल्पना आणि शैक्षणिक दृष्टिकोन यामुळे सोनार यांच्या सादरीकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
     या यशामागे त्यांना गटशिक्षणाधिकारी  राम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अनसर शेख, तानाजी गवारी, दिलीप वाघमारे, शिवपुत्र मणूर, केंद्रप्रमुख रतन जगताप यांच्यासह काराजनगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संगीता लेंगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच काराजनगी शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक सर्जेराव साळे, ज्ञानदेव पडूळकर, मलाप्पा मुंजे, नामदेव नरळे, भाऊसाहेब यादव, सचिन सावंत, संदेश कांबळे, नूरजहान मुल्ला आणि पालकवर्गाचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
     श्रीकांत सोनार यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका व जिल्हा पातळीवर उल्लेखनीय यश मिळवून दिले आहे. स्वतःही त्यांनी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शनांमध्ये अनेक वेळा सहभाग नोंदविला असून, याही वर्षी त्यांना राज्यस्तरावर सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
     या यशाबद्दल केंद्रातील व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी श्रीकांत सोनार यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याची व विज्ञान विषयातील योगदानाची शिक्षण क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.