जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाच्या जननी, समाजक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भोसले हॉस्पिटल, जत येथील डॉ. रजनी भोसले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रेश्मा लवटे यांनी केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. रजनी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. समाजातील अंधश्रद्धा, स्त्री शिक्षणावरील बंधने व सामाजिक अन्याय यांविरोधात सावित्रीबाईंनी दिलेल्या संघर्षाचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले. “शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण, समता व मानवमूल्यांवरील कार्य अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते न थांबता समाजासाठी संवेदनशील व जबाबदार नागरिक घडावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करून समाजात समानता, शिक्षण व न्यायाच्या मूल्यांची जोपासना करण्याचा संकल्प करण्यात आला.

