yuva MAharashtra विकास टकले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण; कुटुंबीयांचा इशारा

विकास टकले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण; कुटुंबीयांचा इशारा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत येथील जनावर बाजार परिसरात दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या कै. विकास मलकारी टकले यांच्या निघृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीय उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन संशयितांना अटक करण्यात आली असली, तरी उर्वरित आरोपी मोकाट फिरत असल्याने आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
     उपोषणकर्त्या सुमन इराप्पा बंडगर, लक्ष्मी मल्हारी कुलाल व प्रीताबाई मलकारी टकले (सर्व रा. उमदी, ता. जत) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. विकास मलकारी टकले यांची हत्या मुख्य आरोपी रविंद्र बंडगर व विराज पांढरे यांनी केली आहे. मात्र या खुनामागे आणखी संशयित आरोपींचा सक्रिय सहभाग असून, गेल्या १२ ते १३ वर्षांपासून जमिनीच्या वादातून हा कट रचण्यात आला असल्याचा त्यांचा आरोप आहे.
     पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, सदर संशयित आरोपींनी यापूर्वी “तुला जिवंत सोडणार नाही” अशी थेट धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी त्यातील एका संशयित आरोपीने मयत विकास टकले यांना गाडीवर बसवून जत येथे आणले होते. तसेच संशयित आरोपी हे वारंवार अर्जदारांना जीवे मारण्याची धमकी देत असून, त्यांचे मुख्य आरोपींशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित कटातूनच करण्यात आल्याचा ठाम संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
    आम्ही महिला असल्याने आमच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असून, संशयित आरोपींकडून कधीही अनर्थ घडू शकतो, अशी भीती उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून उर्वरित सर्व संशयित आरोपींवर सात दिवसांच्या आत कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
     या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली असून, न्यायालयीन व पोलीस तपासाच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.