जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ७२ वरील मोजे मुचंडी येथे पायानेवस्तीजवळ असलेल्या धोकादायक साकवढयाऐवजी मोठ्या पुलास अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या पुलासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जत तालुक्यातील गिरगाव, भिवर्गी, संख, दरिबडची, मुचंडी, रावळगुंडेवाडी, बसर्गी, गुवाड व बाळिगिरी या गावांना जोडणारा जिल्हा मार्ग क्र. ७२ हा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या रस्त्यावरून कर्नाटक राज्यातील श्री. धर्मस्थळ, धानम्मादेवी आदी देवस्थानांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह पूर्व भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई ला जोडणारा असल्याने वाहतुकीची वर्दळ वर्षभर मोठ्या प्रमाणात असते.
मात्र मोजे मुचंडी येथे असलेला पावसाळ्यात पाण्याखाली जाणारा जुनापूल नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. मुसळधार पावसात मेंढेगिरी उमराणी, उंटवाडी, रावळगुंडेवाडी, पच्छापूर आदी भागातील पाणी मोठ्या प्रमाणात पुलावरून वाहत असल्याने अनेक वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती. परिणामी नागरिकांचे हाल होत होते, तर आपत्कालीन सेवा, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत होती.
या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेचे नगरसेवक प्रमोद हिरवे व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ऐवळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मोठ्या पुलाची मागणी केली होती. या मागणीचा सखोल विचार करून व सातत्याने पाठपुरावा केल्याने संबंधित ठिकाणी मोठ्या पुलास मंजुरी मिळाली आहे.
पूल मंजूर झाल्यामुळे भविष्यात पावसाळ्यातील वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका व नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जत तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

