yuva MAharashtra OBC आरक्षणामुळे मुचंडी गटात राजकीय भूकंप! परंपरा मोडीत; अँड. चिदानंद मठपतींच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; रणांगण तापणार?

OBC आरक्षणामुळे मुचंडी गटात राजकीय भूकंप! परंपरा मोडीत; अँड. चिदानंद मठपतींच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; रणांगण तापणार?

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     मुचंडी जिल्हा परिषद गट यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी राखीव झाल्याने या गटातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली असून, निवडणूक लढत अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. आरक्षणाच्या बदललेल्या गणितामुळे अनेक इच्छुकांची समीकरणे कोलमडली असताना, जत तालुक्यातील नामवंत वकील तथा समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अँड. चिदानंद मठपती यांच्या संभाव्य उमेदवारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
     मुचंडी जिल्हा परिषद गटात एकूण १६ गावांचा समावेश असून, त्यापैकी मुचंडी पंचायत समिती गणातील ६ तर खोजनवाडी पंचायत समिती गणातील १० गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पंचायत समिती गटांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने, जिल्हा परिषद स्तरावर सक्षम OBC उमेदवार शोधणे हे पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत होते. अशा परिस्थितीत मेंढेगिरी येथील रहिवासी आणि जत न्यायालयात कार्यरत असलेले अँड. चिदानंद मठपती यांचे नाव पुढे येताच, या गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
     या गटात लिंगायत समाजाचे संख्याबळ लक्षणीय असल्याने, या समाजातील उमेदवाराला निर्णायक आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आतापर्यंत मुचंडी गावातूनच उमेदवारी दिली जाण्याची परंपरा होती. मात्र, यावेळी मेंढेगिरी गावातून प्रथमच उमेदवार पुढे येण्याची शक्यता निर्माण झाल्याने इतर इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, अंतर्गत राजकारणही तापू लागले आहे.
     अँड. चिदानंद मठपती हे उच्च शिक्षित, अभ्यासू, कायदेविषयक सखोल जाण असलेले आणि सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सामाजिक प्रश्नांवरील त्यांची भूमिका, न्यायालयीन लढ्यांचा अनुभव आणि तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क यामुळे त्यांची उमेदवारी केवळ औपचारिक न राहता प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाने अनेक राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असून, पक्षीय स्तरावरही हालचालींना वेग आला आहे.
     OBC आरक्षणामुळे बदललेली गणिते, लिंगायत समाजाचा संभाव्य निर्णायक कौल आणि परंपरा मोडून येऊ घातलेली उमेदवारी — या सर्व घटकांमुळे मुचंडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार आणि निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मुचंडी गटातील राजकीय समीकरणे खरोखरच बदलणार का?
लिंगायत समाजाचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार?
या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात उमेदवारी जाहीर होताच स्पष्ट होणार असून, मुचंडी जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.