yuva MAharashtra अवैध बायोडिझेल साठा जप्त; 21.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध बायोडिझेल साठा जप्त; 21.47 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील बायोडिझेल साठा जप्त करण्यात उमदी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सुमारे 19,100 लिटर बायोडिझेलसह एकूण 21 लाख 47 हजार 310 रुपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     ही कारवाई 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.45 वाजता उमदी ते विजयपूर रस्त्याच्या पूर्व बाजूस, बोर्गी गावाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी उमदी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 04/2026 नुसार बीएनएस कलम 287, 318(4) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्याद पोहेकॉ आगतराव मासाळ यांनी दिली आहे. आरोपी म्हणून मलक्काण्णा रेवाप्पा कुंबार (वय 42, रा. तंबक दोड्डी, होर्ती, जि. विजयपूर, कर्नाटक), रवि लोणी (रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) व संगाप्पा होर्तीकर (रा. होर्ती, जि. विजयपूर, कर्नाटक) यांची नावे नमूद आहेत.
     पोलिसांनी केलेल्या छाप्यात विविध क्षमतेच्या प्लास्टिक व लोखंडी टाक्यांमध्ये साठवलेले बायोडिझेल, डिझेल मोजण्यासाठीची इलेक्ट्रिक मशीन, मोटारी, बॅटरी, इनव्हर्टर, पाईप, बॅरेल, मोजमापाची साधने, हिशोबाची वही, कॅल्क्युलेटर, मोबाईल हँडसेट तसेच 35,510 रुपये रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 12,000 लिटर क्षमतेची लोखंडी टाकीही आढळून आली.
     तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी बिगरपरवाना शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत बायोडिझेलचा अवैध साठा ठेवून विक्री करण्याची तयारी केली होती. आवश्यक परवानगी व नियमांचे उल्लंघन करून हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
     सदर गुन्हा 2 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.28 वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करत आहेत. कारवाईत पोहेकॉ कांबळे यांनी सहभाग घेतला. अवैध इंधन साठवण व विक्रीमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.