yuva MAharashtra पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा शहरात धुमाकूळ | नगरसेवकासह नऊ नागरिक जखमी; मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा शहरात धुमाकूळ | नगरसेवकासह नऊ नागरिक जखमी; मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क-
     जत शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत नगरसेवकासह नऊ नागरिकांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे काही काळ शहरात गोंधळाची व दहशतीची स्थिती निर्माण झाली. जखमींवर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
     ही घटना जत शहरातील आंबेडकरनगर, महाराणा प्रताप चौक तसेच सातारा रोड परिसरात घडली. पिसाळलेला कुत्रा अचानक नागरिकांच्या अंगावर धावत येऊन चावे घेत असल्याने रस्त्यावर एकच अफरातफर उडाली. नागरिकांनी आरडाओरड करून एकमेकांना सावध केले तसेच कुत्र्याचा पाठलाग करत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
     या हल्ल्यात दिनेश सुभाष मानवर, श्रद्धा मदनराव मानेपाटील, शारदा आवटी, रमेश साबळे, फारुख मुल्ला, सुखदेव हिप्परकर, प्रतीक वळसंग, नगरसेवक तथा काँग्रेस गटनेते भूपेंद्र कांबळे आणि मुनेवार शेख हे जखमी झाले. काही जखमींच्या जखमा खोलवर असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
     आंबेडकरनगर परिसरात एका लहान मुलावर कुत्रा झडप घालण्याचा प्रयत्न करत असताना नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी प्रसंगावधान राखत कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. नगरसेवक स्वतः जखमी झाल्याने नागरिकांमध्ये अधिकच संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
     या घटनेनंतर जत शहरात मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषद व प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags: