जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राज्यातील मूलभूत सुविधांच्या विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जत नगर परिषदेस परिषद संलग्न सौरऊर्जा प्रकल्पास शासनाची मान्यता मिळाली असून या प्रकल्पासाठी तब्बल ₹६ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जत नगर परिषदेच्या ऊर्जा व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल घडणार असून वीज खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून मंजूर झालेल्या पर्यावरण प्रकल्पाचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे नगर परिषदेच्या विविध कार्यालये, पाणीपुरवठा यंत्रणा, रस्त्यावरील दिवे तसेच इतर नागरी सुविधा सौरऊर्जेवर चालविणे शक्य होणार आहे. परिणामी महागड्या पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन नगर परिषदेचा वार्षिक वीज खर्च लक्षणीय प्रमाणात घटणार आहे. वाचलेल्या निधीचा उपयोग शहरातील इतर विकासकामांसाठी करता येणार असल्याने नागरिकांनाही त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
हरित ऊर्जा, स्वयंपूर्णता आणि आधुनिक पायाभूत सुविधा या संकल्पनांवर आधारित हा प्रकल्प जत शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सौरऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागणार असून स्वच्छ व हरित शहर घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ग्रामीण व निमशहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल जत शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात येत आहे.
एकूणच, “हरित ऊर्जेतून समृद्ध भविष्याकडे वाटचाल” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारा हा सौरऊर्जा प्रकल्प जत नगर परिषदेच्या विकास प्रवासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.जत नगरपरिषदेसाठी १ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पास तांत्रिक मंजुरी मिळणे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेचा वीजखर्च कमी होऊन आर्थिक बचत होईल, तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेला चालना मिळेल. जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.- आमदार गोपीचंद पडळकर, जत विधानसभा

