जनप्रभा फाऊंडेशनचा सामाजिक प्रहार; शिवाजी पेठेत नवव्या वर्षीही उपक्रमाचा ठसा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरातील शिवाजी पेठ येथे जनप्रभा फाऊंडेशनच्या वतीने सलग नवव्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी “दारू नको, दूध प्या” हा समाजप्रबोधनात्मक उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्यसनमुक्तीचा ठाम संदेश देणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम ढोणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात युवकांना दारूच्या व्यसनापासून परावृत्त करून सुदृढ व सकारात्मक जीवनशैलीकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याने युवकांनी त्याचे दुष्परिणाम ओळखून व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन विक्रम ढोणे यांनी केले.
या प्रसंगी नूतन नगरसेवक भूपेंद्र कांबळे, विकास माने, साहेबराव कोळी, मुन्ना पखाली, प्रकाश माने, निलेश बामणे आदींचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले, “आम्ही नगरपालिकेत विरोधी बाकावर असलो तरी जनतेचा आवाज बनून काम करत राहू. चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करू आणि जत शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करू.” त्यांनी जनप्रभा फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भैरप्पा माळी, अजितकुमार पाटील, रमेश मिसाळ, मुरलीधर लवटे, संजय पिंटू व्हनमाने, केराबा फोंडे, श्रावण मोटे, विजय खांडेकर, गणेश खिलारे, अतुल व्हनमाने, प्रवीण खिलारे, सार्थक गावडे, संभाजी मोटे, युवराज जाधव, मिथुन माने, गोविंद शिंगाडे, दादा शिंदे, अन्नू शिंदे, शुभम व्हनमाने यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
नववर्षाच्या स्वागताला दारूऐवजी दूधाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा ठरल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत होती.

