जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईलचा बेकायदेशीर वापर करून मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ चित्रीत करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग केल्याबद्दल आनंदा तम्मा मोरे (रा. मोरे कॉलनी, जत) याच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ७ मधील एस. आर. व्ही. एम. हायस्कूल येथील मतदान केंद्रातील बूथ क्रमांक १ मध्ये संशयित आनंदा मोरे मतदानासाठी जाताना मोबाईल फोन लपवून केंद्रात घेऊन गेला. मतदान करत असताना त्याने मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. सदर व्हिडिओ संपादित करून त्यावर गाणी टाकून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला असून मोबाईलवरील ‘स्टेटस’लाही तो व्हिडिओ ठेवण्यात आला होता.
या प्रकारामुळे निवडणूक आचारसंहिता तसेच गोपनीय मतदान प्रक्रियेचा स्पष्ट भंग झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत राजाराम बाबूराव पडोळकर (वय ५८, रा. कुणीकोनूर, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आज सायंकाळी सात वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी देवर्षी करीत आहेत.
या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील शिस्त व गोपनीयता राखण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

