जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जत येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था अमोल डफळे यांच्या मध्यावधी बदलीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश देत, डफळे यांना जत येथील पदावरच पुढील आदेश येईपर्यंत काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ३१ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार डफळे यांची बदली जिल्हा सातारा येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) या रिक्त पदावर करण्यात आली होती. मात्र ही बदली मुदतपूर्व व मध्यम कार्यकाळातील असल्याने, शासकीय सेवकांच्या बदल्या व कर्तव्यपूर्तीतील विलंब प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार मुख्यमंत्री यांची पूर्वमंजुरी आवश्यक असल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात संबंधित विभागाच्या मंत्र्यांची मंजुरी घेण्यात आली असली, तरी मुख्यमंत्री यांची पूर्वपरवानगी घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत नसल्याचे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले आहे. तसेच ही बदली स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अर्जदारास कार्यमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (सामान्य सेवा अटी) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक २९ ते ३१ नुसार आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आले. या सर्व बाबींचा विचार करून न्यायाधिकरणाने डफळे यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती देत, पुढील सुनावणीपर्यंत विद्यमान स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

