yuva MAharashtra मिरज विभागात डार्क स्पॉटवर पोलिसांची धडक कारवाई; ५० गुन्हे दाखल

मिरज विभागात डार्क स्पॉटवर पोलिसांची धडक कारवाई; ५० गुन्हे दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | मिरज
      मिरज विभागातील अंधाऱ्या व निर्जन ठिकाणी दारू पिणारे, नशा करणारे तसेच अवैध प्रकार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एकूण ५० गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई Sangli District Police यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
     भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’च्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार वाढत्या नशाखोरीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
संयुक्त पथकांची निर्मिती;
     मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथके तयार करून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मिरज शहर व कुपवाड परिसरातील अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी मोटारसायकल व पायी गस्त घालत छापेमारी केली.
५० गुन्ह्यांची नोंद;
     या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, दारू पिण्याच्या उद्देशाने थांबलेले, नशा करणारे तसेच अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
मिरज शहर पोलीस ठाणे येथे ३० गुन्हे
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे १६ गुन्हे
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे ४ गुन्हे
असे एकूण ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन;
     सांगली जिल्हा पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी परिसरात दारू पिणे, नशा करणे किंवा इतर बेकायदेशीर प्रकार आढळल्यास त्वरित डायल ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
     या धडक मोहिमेमुळे मिरज विभागातील डार्क स्पॉटवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा पोलिसांचा निर्धार अधोरेखित झाला आहे.

जाहिर आवाहन;
     भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान च्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे, दारू पिण्याच्या उद्देशाने थांबलेले तसेच नशा करणाऱ्या संशयित इसमांवर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रभावी व सातत्यपूर्ण धडक कारवाई करण्यात येत आहे.
     नागरिकांनी अशा कोणत्याही गैरप्रकाराची माहिती तात्काळ डायल ११२ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन Sangli District Police दलातर्फे करण्यात येत आहे.