जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर अखेर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक हायवा डंपर (क्रमांक KA 28 AB 1440) तसेच एक विनानंबर जेसीबी मशीन जप्त करण्यात आली आहे.
डोणभाग परिसरातील ‘तांबडा टेक’ हद्दीत तसेच अन्य ठिकाणी बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विनापरवाना मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत माननीय उपविभागीय अधिकारी, जत यांच्या पथकाने डोणभाग परिसरातील तांबडा टेक हद्दीतील सोनार मळा येथे अचानक छापा टाकला. धाडीदरम्यान घटनास्थळी एक हायवा डंपर व एक जेसीबी यंत्र आढळून आले. संबंधित दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात, सभागृहासमोर उभी करण्यात आली आहेत.
ही कारवाई उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होत असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर कारवाई पथक प्रमुख राजेश चाचे (मंडळाधिकारी, कुंभारी) तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर सातत्याने अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

