yuva MAharashtra प्रभाग क्र. ८ मध्ये आठवड्यातून एक दिवस भाजीपाला बाजाराचा निर्णय; नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार | नगरसेवक माने व बामणे यांचा पाठपुरावा

प्रभाग क्र. ८ मध्ये आठवड्यातून एक दिवस भाजीपाला बाजाराचा निर्णय; नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार | नगरसेवक माने व बामणे यांचा पाठपुरावा

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत शहरातील प्रभाग क्र. ८ मधील नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर आठवड्यातून एक दिवस भाजीपाला बाजार सुरू करण्याचा निर्णय नगरसेवक विकास माने आणि महिला व बालविकास सभापती सुप्रिया बामणे यांनी घेतला आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
     प्रभाग क्र. ८ मधील चैतन्य नगर, खासणीस प्लॉट, कुंभार प्लॉट, विद्युत नगर, बसवेश्वर नगर, शिक्षक कॉलनी, श्रीकृष्ण नगर, विद्यानगर, तुराई नगर, महसूल कॉलनी, एस.टी. कॉलनी, पत्रकार नगर आणि साईनगर या भागातील नागरिकांनी स्थानिक पातळीवर भाजीपाला बाजार सुरू करण्याची मागणी सातत्याने केली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
     विद्यानगर वसाहत आणि तुराई नगर परिसरात नगरपरिषदेची मोकळी जागा उपलब्ध असून ती भाजी विक्रेत्यांसाठीही सोयीची आहे. प्रभागातील मध्यवर्ती ठिकाणी बाजार भरल्यास विक्रेत्यांची विक्री वाढण्यास मदत होणार असून नागरिकांनाही ताजा व स्वच्छ भाजीपाला सहज उपलब्ध होईल. विशेषतः महिलांना बाजारात दूर जाण्याची गरज कमी होणार आहे.
     दरम्यान, या उपक्रमासाठी लवकरच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी आणि उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विकास माने आणि सुप्रिया बामणे यांनी दिली. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.