yuva MAharashtra खैरावच्या वेदांत गडदेची आयआयटी कानपूरमध्ये निवड; गडदे कुटुंबाची शैक्षणिक परंपरा कायम

खैरावच्या वेदांत गडदेची आयआयटी कानपूरमध्ये निवड; गडदे कुटुंबाची शैक्षणिक परंपरा कायम

जत वार्ता न्यूज
By -

देशातील प्रतिष्ठित आयआयटीत प्रवेश मिळवून वेदांतने उंचावला जत तालुक्याचा मान


जत | प्रतिनिधी :
     जत तालुक्यातील खैराव गावचा सुपुत्र वेदांत अविनाश गडदे याने आपल्या मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे प्रवेश मिळवून गावासह संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
     आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणे हे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. अत्यंत कठीण स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवत वेदांतने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.
     वेदांतचा धाकटा भाऊ कार्तिक गडदे यानेदेखील नवोदय विद्यालय, पलूस येथे प्रवेश मिळवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे गडदे कुटुंबातील शैक्षणिक वारसा आणि गुणवत्तेची परंपरा पुढील पिढीतही तितक्याच सक्षमपणे जोपासली जात असल्याचे दिसून येत आहे.
     वेदांतचे वडील अविनाश उत्तम गडदे हे माध्यमिक शिक्षक असून आई उच्चशिक्षित आहेत. आजोबा उत्तम गडदे व आजी रुक्मिणी गडदे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर चुलते अतुल गडदे हेही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या कुटुंबाने समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचे कार्य केले आहे.
     विशेष म्हणजे, गडदे कुटुंबातील यापूर्वीही दोन सदस्यांनी आयआयटीमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. वेदांतचे चुलत आजोबा भालचंद्र गडदे यांचे पुत्र सौरभ गडदे यांनी आयआयटी खरगपूरमधून शिक्षण पूर्ण करून सध्या केंद्र शासनाच्या सेवेत क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर ओंकार गडदे यांनी आयआयटी मुंबई (पवई) येथून शिक्षण पूर्ण करून एका अमेरिकन बँकेत उच्च पदावर आपली कारकीर्द घडवली आहे.
     आता वेदांतच्या रूपाने गडदे कुटुंबातील तिसऱ्या सदस्याने आयआयटीमध्ये प्रवेश मिळविल्याने खैराव गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशामुळे खैराव गावाची स्वतंत्र शैक्षणिक ओळख निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
     वेदांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षणप्रेमी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

गडदे कुटुंबातील तीन आयआयटी विद्यार्थी; खैराव गावाची शान

🔹 सौरभ भालचंद्र गडदे
आयआयटी खरगपूर येथून शिक्षण पूर्ण
सध्या केंद्र शासनाच्या सेवेत क्लास वन अधिकारी

🔹 ओंकार भालचंद्र गडदे
आयआयटी मुंबई (पवई) येथून शिक्षण पूर्ण
सध्या अमेरिकन बँकेत उच्च पदावर कार्यरत

🔹 वेदांत अविनाश गडदे
आयआयटी कानपूर येथे प्रवेश प्राप्त

शिक्षण, संस्कार, गुणवत्ता आणि परिश्रम यांच्या बळावर गडदे कुटुंबाने खैराव गावाचे नाव राज्यासह देशभर उज्ज्वल केले आहे.