yuva MAharashtra हर घर तिरंगा रॅली व भारताची फाळणी आणि त्यामागील बलिदान या विषयावर परिसंवाद संपन्न; राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

हर घर तिरंगा रॅली व भारताची फाळणी आणि त्यामागील बलिदान या विषयावर परिसंवाद संपन्न; राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

जत वार्ता न्यूज
By -
जत | प्रतिनिधी;
     राजे रामराव महाविद्यालय,जत येथे राष्ट्रीय सेवा योजना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा रॅली व भारताची फाळणी व त्यामागील बलिदान या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हर घर तिरंगा - 2026 या मोहिमेअंतर्गत  तिरंगा ध्वज जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात तिरंगा ध्वज घेऊन सुनेत्रा कॉलनीतून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी, भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी कि जय, जय जवान-जय किसान अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी महाविद्यातील सकाळ सत्राचे प्र.प्राचार्य डॉ.भिमाशंकर डहाळके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी, डॉ.सोमनाथ गायकवाड यांनी फेरीचे नेतृत्व केले.
        यावेळी प्रा.डॉ.सलीम पठाण यांनी भारताची फाळणी व त्यामागील बलिदान या विषयावर बोलताना त्यांनी  राष्ट्राची संकल्पना, राष्ट्रनिर्मितीचे घटक, भारतीय राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया, द्विराष्ट्रवादाची संकल्पना, फाळणीमागील तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती तसेच फाळणीच्या काळात सामान्य जनतेने सोसलेले दुःख आणि दिलेले बलिदान यावर प्रकाश टाकून फाळणीच्या घटनांकडे केवळ राजकीय निर्णय म्हणून न पाहता त्यामागील मानवी वेदना, विस्थापन आणि बलिदान समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर डहाळके यांनी इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांनी वर्तमानकाळातील सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांकडे चिकित्सक आणि समतोल दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
     महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.कृष्णा रानगर यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विशाल गोडबोले यांनी तर कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य, इतिहास विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य डॉ.रामदास बनसोडे उपस्थित होते.