yuva MAharashtra ५० दिवस अखंड स्वच्छतेचा संकल्प; जागर फाउंडेशनच्या महा स्वच्छता अभियानात आमदार गोपीचंद पडळकरांचा सहभाग

५० दिवस अखंड स्वच्छतेचा संकल्प; जागर फाउंडेशनच्या महा स्वच्छता अभियानात आमदार गोपीचंद पडळकरांचा सहभाग

जत वार्ता न्यूज
By -

जत नगरीची ग्रामदैवत श्री यल्लमा देवी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम; सामाजिक कार्याचे आमदारांकडून कौतुक


जत | प्रतिनिधी : 
     जत शहरात जागर फाउंडेशनच्या वतीने गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचा पन्नासावा दिवस ग्रामदैवत श्री यल्लमा देवी मंदिर परिसरात महा स्वच्छता अभियान राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः हातात फावडे घेऊन परिसराची स्वच्छता केली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
     जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम मोरे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या अभियानाने शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण केली आहे. सलग ५० दिवस विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून संस्थेने सामाजिक बांधिलकीचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे.
     जागर फाउंडेशनने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. कोरोना महामारीच्या काळात औषध फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण तसेच नागरिकांना विविध प्रकारची मदत करण्यात आली होती. सांगलीतील महापुरानंतरही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काही प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून मदतीचा हात दिला होता.
     यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, स्वच्छतेसारखे काम सातत्याने करणे अत्यंत कठीण असते. मात्र जागर फाउंडेशनने अखंडपणे हे कार्य सुरू ठेवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सलग ५० दिवस निस्वार्थ भावनेने स्वच्छता अभियान राबविणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हे यश संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
     संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानताना हे स्वच्छता अभियान भविष्यातही अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
     या महा स्वच्छता अभियानात उपनगराध्यक्ष विक्रम ताड, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक कुमार साळे, फिरोज मुल्ला, प्रमोद हिरवे, प्रवीण वाघमोडे, राजू यादव, अतुल मोरे, अनिल पाटील तसेच भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मग नगरपरिषदेला का जमत नाही?
     जागर फाउंडेशनसारखी सामाजिक संस्था गेल्या ५० दिवसांपासून सातत्याने जत शहरात स्वच्छता मोहीम राबवत असताना नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग आणि संबंधित यंत्रणा याबाबत उदासीन का आहेत, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने आणि स्वच्छता विभागाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी सामाजिक संस्थांसोबतच पालिका प्रशासनानेही सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.