जत | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नसून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर तेही जिल्हा व राज्य पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा, येळवी येथील विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखविले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा, येळवी येथील विद्यार्थी हर्षद बीराप्पा सोलनकर याने ८५.३३ टक्के गुण मिळवत जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे या यशासोबतच त्याने सांगली जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवून प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
हर्षद सोलनकर याने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि संस्थेचे पाठबळ मिळाल्यास ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थीही मोठी शैक्षणिक झेप घेऊ शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.
विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्था, उटगीचे अध्यक्ष मा. एम. बी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील, सचिव डॉ. शिवगोंडा पाटील, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बाबानगर सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी हर्षदचे अभिनंदन केले. शाळेने सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हर्षदच्या या यशामुळे प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली आहे.
जत तालुक्यात प्रथम आणि सांगली जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळविणाऱ्या हर्षद बीराप्पा सोलनकरचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

