yuva MAharashtra हिवरे येथे तरसाच्या हल्ल्यात माय-लेक जखमी; वन विभागाकडून तातडीने उपाययोजना | जखमींवर मिरजेत उपचार सुरू; परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

हिवरे येथे तरसाच्या हल्ल्यात माय-लेक जखमी; वन विभागाकडून तातडीने उपाययोजना | जखमींवर मिरजेत उपचार सुरू; परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्यातील हिवरे गावात मंगळवारी रात्री वन्यप्राणी (तरस) हल्ल्याची घटना घडली असून, या हल्ल्यात माय-लेक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
     वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास हिवरे येथील राहत्या घराच्या परिसरात वन्यप्राणी तरसाने हल्ला केला. या हल्ल्यात सरूबाई बापू बंडगर (वय ६२) व त्यांचा मुलगा विश्वास बापू बंडगर (वय ४२) हे गंभीर जखमी झाले.
      घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ग्रामपंचायत हिवरे कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तरसाच्या हालचालींची माहिती घेण्यात आली आहे.
      वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून वन्यप्राण्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यकतेनुसार पिंजरा लावणे, जनजागृती करणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनाही हाती घेण्यात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
     दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पहाटे व सायंकाळच्या वेळेत शेतात किंवा निर्जन ठिकाणी एकटे जाणे टाळावे तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वन्यप्राणी आढळल्यास त्याला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
     नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून परिस्थितीवर वन विभागाचे सातत्याने लक्ष असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.