yuva MAharashtra आयटी क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कौशल्यविकास आणि इंटर्नशिपला पर्याय नाही – सचिन अनुसे

आयटी क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कौशल्यविकास आणि इंटर्नशिपला पर्याय नाही – सचिन अनुसे

जत वार्ता न्यूज
By -

राजे रामराव महाविद्यालय, जत येथे ‘करंट आयटी इंडस्ट्री एक्स्पेक्टेशन अँड इंटर्नशिप’ कार्यशाळा उत्साहात


जत | प्रतिनिधी :
       राजे रामराव महाविद्यालय, जत येथील बी.सी.ए. विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने "करंट आयटी इंडस्ट्री एक्स्पेक्टेशन अँड इंटर्नशिप" या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, रोजगाराच्या संधी, उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा आणि इंटर्नशिपचे महत्त्व यांची प्रत्यक्ष माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी रियालिटी सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक श्री. सचिन अनुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते.
         प्रमुख पाहुणे श्री. सचिन अनुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयटी क्षेत्रातील सध्याचे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा आढावा घेतला. त्यांनी उद्योगक्षेत्राला केवळ पदवीधर नव्हे, तर तांत्रिक ज्ञानासोबत संवादकौशल्य, टीमवर्क, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सातत्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी असलेले विद्यार्थी अपेक्षित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अधिकची माहिती देताना ते म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव देणाऱ्या इंटर्नशिपला प्राधान्य दिले पाहिजे. इंटर्नशिपमुळे आत्मविश्वास वाढतो, व्यावसायिक कौशल्ये विकसित होतात आणि रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतात.
       अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे प्रभावी नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले. उच्च शिक्षणासोबत कौशल्याधारित प्रशिक्षण स्वीकारल्यास करिअरच्या वाटचालीत निश्चित यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्यांचा सातत्याने विकास करावा. ज्ञान, कौशल्य आणि मूल्ये यांचा समतोल साधणारे विद्यार्थीच भविष्यात यशस्वी व्यावसायिक ठरतात.
        कार्यक्रमाच्या प्रारंभी बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. पी. डी. माळी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात इंटर्नशिपचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडले जाण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. आर. एस. खडतरे यांनी केले. यावेळी विभागातील प्रा. जे. आय. बाळीकाई, प्रा. व्ही. ए. सुर्वे तसेच बी.सी.ए. विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक वातावरण निर्माण केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.