yuva MAharashtra परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा सुचविण्यासाठी राज्य मंडळाचे येळवीचे सुपुत्र शिवाजी खांडेकर यांना पत्र

परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा सुचविण्यासाठी राज्य मंडळाचे येळवीचे सुपुत्र शिवाजी खांडेकर यांना पत्र

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ;
     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा व्यवस्थेतील कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुकर करण्यासाठी राज्यभरातील शिक्षकेतर संघटनांकडून सूचना व सुधारणा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, पुणेचे सरकार्यवाह तथा येळवी गावचे सुपुत्र शिवाजी खांडेकर यांना राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांच्या स्वाक्षरीने अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
     या पत्रात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षांच्या कामकाजाबाबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सूचना, अनुभव व आवश्यक सुधारणा दिनांक ३१ जुलै २०२६ पर्यंत राज्य मंडळाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर पत्र राज्य मंडळाचे अध्यक्ष यांच्या मान्यतेने पाठविण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
     शिवाजी खांडेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक, प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परीक्षा कामकाजातील अडचणी, कर्मचारी हिताचे प्रश्न तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी वेळोवेळी शासन व संबंधित यंत्रणांकडे प्रभावीपणे भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांचे हित, परीक्षेतील पारदर्शकता, निकाल प्रक्रिया अधिक विश्वासार्ह करणे आणि विद्यार्थ्यांना सुलभ, न्याय्य व गुणवत्तापूर्ण परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या सूचनांचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाची आणि अभ्यासपूर्ण सूचनांची दखल घेत राज्य मंडळाने त्यांच्याकडून सूचना मागविल्या असल्याचे मानले जात आहे.
     विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी शिवाजी खांडेकर यांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून व्यक्त केला जात आहे. येळवी गावच्या सुपुत्राला राज्यस्तरावर मिळालेली ही दखल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली असून, त्यांच्या कार्याचा परिसरात सर्वत्र गौरव होत आहे.