जत | प्रतिनिधी :
जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चंद्रभागा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर तुकाराम बाबा महाराज यांनी प्रति विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करून वरुणराजाने बळीराजावर कृपावृष्टी करावी, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.
आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या धार्मिक उपक्रमात विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील बालभक्तांना चंद्रभागेच्या तीरावर नेऊन तुकाराम बाबा महाराजांनी पूजन केले. कोरड्या पडलेल्या नदीचे दर्शन घेत त्यांनी पांडुरंगाच्या चरणी पावसासाठी साकडे घालत, शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकट दूर करण्याची विनवणी केली.
यंदा आषाढ महिना संपत असतानाही अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. पंढरपूर येथे चंद्रभागेत काही प्रमाणात पाणी असले तरी परिसरातील नदीपात्रे अद्याप कोरडीच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांवर संकटाचे ढग दाटले असून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर तुकाराम बाबा महाराज यांनी श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संदेश देत चंद्रभागेच्या तीरावर प्रति विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडविले. "विठ्ठलाच्या कृपेने वरुणराजा प्रसन्न होऊन राज्यात चांगला पाऊस पडावा, नद्या-नाले भरून वाहावेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी यावी," अशी प्रार्थना त्यांनी केली.

