जत | प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक आढावा बैठक जत येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करणे, बूथस्तरावरील यंत्रणा सक्षम करणे, गावागावांत पक्षाचा विस्तार करणे तसेच आगामी राजकीय धोरणांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस सांगली जिल्हाध्यक्ष देवराजदादा पाटील यांच्यासह पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन जत तालुकाध्यक्ष मन्सूर चाचा खतीब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना देवराजदादा पाटील यांनी जत तालुक्यात मन्सूर खतीब यांनी उभी केलेली भक्कम संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यांचा विशेष गौरव केला. महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील यांचे विचार गावागावांत व प्रत्येक समाजघटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगत, त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यात राबविण्यात आलेल्या विकासाभिमुख कामांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. आगामी काळात जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करून पक्षाची मोर्चेबांधणी आणखी प्रभावी करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता ताई जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष सचिन होरतीकर, पक्षाचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, जिल्हा ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष जालिंदर होनमाने, अमोल कराडे, डॉ. संजय कराडे, जत तालुका महिला अध्यक्षा मीनाक्षीताई अक्की, शंकरराव गायकवाड, प्रवीण चव्हाण, बी.आर. पाटील, महादेवप्पा अंकलगी, श्रीकांत हुवाळे व त्यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

