yuva MAharashtra स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा राज्यभर आंदोलन; हभप तुकाराम बाबा महाराजांचा इशारा

स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा राज्यभर आंदोलन; हभप तुकाराम बाबा महाराजांचा इशारा

जत वार्ता न्यूज
By -

महावितरणवर मनमानी वीजबिलांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, ग्राहकांना लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन

जत | प्रतिनिधी : 
     महावितरणकडून बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना अवास्तव वीजबिले येत असून, त्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली कथित लूट तातडीने थांबवून हे मीटर बदलावेत, अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक तथा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.
    यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांची उदाहरणे देत महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, पूर्वी दरमहा सुमारे १,६०० ते १,७०० रुपयांचे वीजबिल येत असताना स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ते थेट १६ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तसेच मागील तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असलेल्या त्यांच्या बिसलरी प्रकल्पाचे तब्बल ४२ हजार रुपयांचे वीजबिल आले असून, त्या प्रकल्पावर सौरऊर्जा यंत्रणा बसविलेली असतानाही इतके जादा बिल कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
     स्मार्ट मीटर बसविण्याचा उद्देश ग्राहकांनी जितकी वीज वापरली तितक्याच प्रमाणात अचूक बिल देणे हा होता. मात्र प्रत्यक्षात वापरात कोणताही लक्षणीय बदल नसताना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत महावितरणकडे विचारणा केल्यानंतर "घरातील लाईटची बटणे लूज असतील" अशा प्रकारची उत्तरे दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
     या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सांगत, अन्यायकारक वीजबिलांना कंटाळलेल्या सर्व ग्राहकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला जयदीप माने, दत्ता सावळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वीज बंद करा, पण रॉकेल द्या;
     वाढत्या वीजबिलांवर संताप व्यक्त करताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, कमी वीज वापरूनही ग्राहकांना धक्कादायक बिले दिली जात आहेत. ही बिले सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. अशा परिस्थितीत सरकारने वीजपुरवठाच बंद करावा, पण किमान चिमणी पेटविण्यासाठी रॉकेल तरी द्यावे, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली.
लाडकी बहीण योजनेतूनच वसुली सुरू आहे का?
     राज्य शासनाच्या 'लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. एका बाजूला महिलांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, तर दुसऱ्या बाजूला अनेकपटीने वाढलेली वीजबिले पाठवून त्याच पैशांची वसुली केली जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.