yuva MAharashtra शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा वारसा शुभांगीताई गावडे यांनी समर्थपणे जोपासला- प्र.प्राचार्य कृष्णा रानगर

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा वारसा शुभांगीताई गावडे यांनी समर्थपणे जोपासला- प्र.प्राचार्य कृष्णा रानगर

जत वार्ता न्यूज
By -

ज्ञानज्योती प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण


जत | प्रतिनिधी; 
     शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या ज्ञानयज्ञातील ज्ञानज्योती म्हणजे स्वर्गीय शुभांगीताई गावडे होय. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा म्हणून कार्य करताना ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हा शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा वारसा त्यांनी जोपासला. श्री स्वामी विवेकानंद यांचा मानव धर्म हाच मानव सेवा असा व्यापक विचार रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य स्वर्गीय शुभांगीताई गावडे यांनी केले. अशीच ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य गुरुदेव कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन प्र.प्राचार्य कृष्णा रानगर यांनी केले.
        ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सचिवा ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.राजकुमार म्हमाणे, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रभाकरभाऊ जाधव व दि फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.मदन बोर्गीकर उपस्थित होते. 
      प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कृष्णा रानगर यांनी ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या शैक्षणिक व संस्कारमय कार्याचा गौरव करुन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.रेश्मा लवटे यांनी  तर आभार प्रा.विशाल गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.