yuva MAharashtra संखच्या अप्पर तहसीलदारांवर गैरकारभाराचे आरोप; जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांची चौकशीची मागणी

संखच्या अप्पर तहसीलदारांवर गैरकारभाराचे आरोप; जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांची चौकशीची मागणी

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्यातील संख महसूल विभागाच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्यावर गैरकारभार, अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
     तक्रारीनुसार, संख अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्याविरुद्ध विविध प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी व आक्षेप असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेसह विविध महसूल कायद्यांतील कलमांनुसार प्रकरणे, हक्कातील नावे कबजेदार सदरी घेण्याची प्रकरणे, रस्त्यांच्या प्रकरणांसह इतर अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणांमध्ये पक्षकारांना अनेक हेलपाटे मारायला लावले जात असून, त्यानंतर आर्थिक तडजोडीसाठी भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
     पांडोझरी येथील सिद्धनाथ परिसरातील वर्ग-२च्या कुळवतन जमिनी वर्ग-१ करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित जमिनींच्या आकारणीबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला असून, चालू बाजारमूल्यानुसार रेडीरेकनर किमतीच्या ठराविक रकमेची वसुली न करता शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
     दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे. संख अप्पर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीमुळे जनता, शेतकरी व गरजू नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करत, या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. तसेच जत तालुक्यातील शेतकरी, जनता व पक्षकारांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.