जत | प्रतिनिधी ;
राजे रामराव महाविद्यालय, जत येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने “रानभाजी सप्ताह २०२६” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.खाडे यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कृष्णा रानगर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना प्राचार्य डॉ.एस.के.खाडे म्हणाले की, रानभाज्यांचे औषधी व पोषणमूल्य अतिशय महत्त्वाचे आहे. शरिरासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्त्वे फायबर आपणास रानभाज्यातून मिळतात. फास्ट फूड च्या जमण्यात आपण रानभाज्याना विसरत चाललो आहोत. पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला अनेक रानभाज्या आहेत. त्यांची माहिती होण्याच्या दृष्टीने हा रानभाज्या सप्ताह अतिशय महत्वाचा आहे असे सांगून त्यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व व दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्राचार्य कृष्णा रानगर यांनी रानभाज्या या नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या वनस्पतींचे संवर्धन व जतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात डॉ.मधुमती शिंदे यांनी रानभाज्यांची ओळख,जैवविविधतेतील स्थान आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. आभार डॉ.एस.एल.सौदागर यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अरविंद पवार, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.मल्लाप्पा उर्फ प्रकाश सज्जन, गणितशास्त्र विभागप्रमुख प्रा.वैभव चांडवले, प्राध्यापिका भाग्यलक्ष्मी माळी, लॅब सुपर वायझर श्री. बी. के. पुजारी यांच्यासह प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

