जत | प्रतिनिधी :
बिळूर येथील राजयोगी शिवयोगी श्री गुरुबसवेश्वर विरक्त मठात नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचे उद्घाटन, गुरु पौर्णिमा निमित्त गुरुपादुका पूजन व विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाले. या भव्य सोहळ्यास सुमारे चार ते पाच हजार भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
परम पूज्य श्री.म.नि.प्र गुरु चन्नबसव महास्वामीजी,व परमपूज्य श्री जगद्गुरु शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी वीरभिक्षावरति मठ हळीहुब्बळी यांच्या पावन सान्निध्यात ध्यानमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. शिल्पा रविकुमार जिवाण्णावर, सरपंच सौ. विद्याश्रीताई लक्ष्मण जखगौंड, मुचंडी जि प सदस्य रमेश देवर्षी, नामद काका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवचनात परमपूज्य श्री म.नि.प्र गुरुचन्नबसव महास्वामीजी यांनी भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा अनन्यसाधारण महत्त्व व्यक्त केले. आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीने ध्यान, धारणा आणि योगाचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिळूर व परिसरातील प्रत्येक क्षेत्र सिंचनाखाली आणून हरितक्रांती घडवावी आणि भारत अधिक समृद्ध व उज्ज्वल व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थितांना आशीर्वाद दिले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मनोगतात गुरु पौर्णिमेच्याच्या पावन दिवशी श्री गुरुबसवेश्वर विरक्त मठात गुरुपादुका पूजन करण्याची संधी लाभणे हे आपले भाग्य असल्याचे सांगितले. मानसिक शांतता, निरोगी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ध्यानाचे महत्त्व अधोरेखित करत जत तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच तालुक्यातील प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचून कोणतेही क्षेत्र वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी स्पष्ट केले, कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
नगराध्यक्ष डॉ रविंद्र आरळी यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची गरज अधोरेखित केली. पुरुषांनी व महिलांनी दिनचर्या, ऋतुचर्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून उत्तम आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या धार्मिक सोहळ्यास निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर मठाच्या वतीने आलेल्या हजारो भावकांसाठी महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम घडविणारा हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहपूर्व व भक्तिमय वातावरण संपन्न झाला..

