लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जत येथे शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता व्याख्यान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शोभा मंगल कार्यालय, अथणी रोड, जत येथे हा कार्यक्रम होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार जयंतरावजी पाटील राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, तसेच माजी कृषी व सहकार मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या साहित्याचा व सामाजिक विचारांचा नव्या पिढीपर्यंत परिचय व्हावा, या उद्देशाने जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने व्याख्यानासोबत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रतापराव शिंदे, अविनाश वाघमारे, प्रकाश देवकुळे, बाजी केंगार, दीपक शिंदे, विक्रम ढोणे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास जत तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल कांबळे यांनी केले आहे.

