yuva MAharashtra महापुरुषांच्या त्यागातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी; दिनराज वाघमारे

महापुरुषांच्या त्यागातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी; दिनराज वाघमारे

जत वार्ता न्यूज
By -

स्वामी विवेकानंद ऑलम्पियाड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा | चिमुकल्यांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेशभूषा ठरल्या आकर्षणाचे केंद्र

जत | प्रतिनिधी: 
     स्वातंत्र्यसैनिक आणि महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान विद्यार्थ्यांनी सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या विचारांतून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन दिनराज वाघमारे यांनी केले. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
      यावेळी संस्थेचे खजिनदार प्रा. तुकाराम सन्नके यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ उत्सव साजरा करण्यात नसून, देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून ती प्रामाणिकपणे पार पाडण्यात आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी. देशाची भावी पिढी म्हणून विद्यार्थ्यांनी सक्षम, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक बनावे, असे त्यांनी नमूद केले.
       ज्योतिर्लिंग ग्रामीण विकास व संशोधन संस्था संचलित स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूल जत येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या भूमिका व वेशभूषा आकर्षणाचे केंद्र ठरले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी प्रतिक बोबडे, शाळेच्या समन्वयक सायली सोनावणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.