जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ तथा मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक संभाजी कोडग यांना लोकमत समूहातर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर यांच्या हस्ते कोडग यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ला जिल्ह्यात नावारूपाला आणण्यात मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्यासह सर्व शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेतही शाळेने तालुका व जिल्हास्तरावर आपला लौकिक कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता चांगले संस्कार, सामाजिक जाणीव आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर शाळेत भर दिला जातो.
शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे शाळेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या कार्याची दखल घेत मुख्याध्यापक संभाजी कोडग यांना लोकमत समूहाचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील बाबर, केंद्रप्रमुख शिंदे, दिनेश वसावे, पत्रकार बादल सर्जे, श्रीकृष्ण पाटील, शिवाजीराव जाधव, गणेश गिड्डे, बाळू चव्हाण, नगरसेवक इम्रान गवंडी आदी मान्यवर उपस्थित होते.

