राजे रामराव महाविद्यालय,जत येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा स्मृतिदिन उत्साहात संपन्न
सर्व सामान्य माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे. समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची संस्कार केंद्रे खेड्यापाड्यात उभी केली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन घडवून आले. शिक्षणामुळे गोरगरिबांची मुले मुख्य प्रवाहात सहभागी झाली, म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.चंद्रसेन मानेपाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर डाहळके होते. यावेळी माझी प्राचार्य शिवाजीराव बिसले, पत्रकार मनोहर कोकळे, विवेकानंद इन्स्टिट्यूटचे बोबडे उपस्थित होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी पुढे बोलताना प्रा.चंद्रसेन मानेपाटील म्हणाले की, शिक्षणामुळेच मानवी जीवनात परिवर्तन घडते. जीवनात परिवर्तन घडवून चांगले यश संपादन करायचे असेल तर थोरामोठ्यांच्या चरित्रांचे वाचन केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर जगदाळे मामा, डॉ.डी.वाय.पाटील, डॉ.पतंगराव कदम व दलित मित्र कदम गुरुजी यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळेच महाराष्ट्र आजही देशात अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रात शिक्षण प्रसारामुळेच सामाजिक क्रांती झाली. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर डॉ.बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे सांगून ते शेवटी म्हणाले की, संत गाडगे महाराज यांचे शिष्य शिंदे महाराज यांनी 1968 साली डॉ.बापूजी साळुंखे यांना शिक्षणमहर्षी ही पदवी दिली.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.भिमाशंकर डाहळके यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कारीत होणे गरजेचे असून कौशल्याधिष्ठीत शिक्षणावर भर दिला पाहिजे असे सांगितले. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद व श्रीमंत रामराव महाराज डफळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी तर शेवटी आभार प्रा.विशाल गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

