yuva MAharashtra जत येथे ४६ वा सांगली जिल्हा युवा महोत्सव रंगणार | विद्यापीठ समितीकडून आयोजनपूर्व तयारीची पाहणी

जत येथे ४६ वा सांगली जिल्हा युवा महोत्सव रंगणार | विद्यापीठ समितीकडून आयोजनपूर्व तयारीची पाहणी

जत वार्ता न्यूज
By -

जत | सांगली : 
     शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ४६ वा सांगली जिल्हा युवा महोत्सव यंदा राजे रामराव महाविद्यालय, जत येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या समितीने आज राजे रामराव महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधा, विविध स्पर्धांसाठीची ठिकाणे तसेच आयोजनासाठी आवश्यक व्यवस्थेची पाहणी केली.
     तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांनी विद्यापीठ समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या बैठकीचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले.
     या पाहणी पथकात शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. घाणे, सांगली जिल्हा समन्वयक तथा प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर जाधव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सातपुते, विद्यार्थी विकास मंडळाच्या श्रीमती आडके तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. शंतनू पाटील यांचा समावेश होता.
     यावेळी महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापकांनी युवा महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात विविध प्रश्न व शंका समितीसमोर मांडल्या. समितीतील सदस्यांनी प्राध्यापकांच्या शंकांचे सविस्तर निरसन करून आयोजनाबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. त्यामुळे महोत्सवाच्या तयारीला अधिक स्पष्ट दिशा मिळाली.
     यावेळी बोलताना विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. घाणे म्हणाले, “शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा युवा महोत्सव यावर्षी राजे रामराव महाविद्यालयात होत आहे. आयोजक महाविद्यालय म्हणून राजे रामराव महाविद्यालय आपल्या उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि सांघिक कार्यातून विद्यापीठाच्या परिक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करेल. महाविद्यालयातील प्राध्यापकांचा उत्साह आणि आयोजनाबाबतची सकारात्मकता पाहता हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव निश्चितच यशस्वी होईल, याबाबत तिळमात्र शंका नाही.”
     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. रानगर म्हणाले, “विद्यापीठाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून राजे रामराव महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल, अशा पद्धतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते एकीने व एकसंधपणे या महोत्सवाच्या आयोजनाला सामोरे जातील. त्यांच्या सांघिक प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून निश्चितच दिसून येईल.”
     युवा महोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, कलावंत आणि संघांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विविध कला प्रकारांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मकतेला चालना मिळणार असल्याने राजे रामराव महाविद्यालय परिसरात युवा महोत्सवाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
    महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी एकजुटीने तयारीला लागले असून, ४६ वा सांगली जिल्हा युवा महोत्सव भव्य व संस्मरणीय करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.