yuva MAharashtra बसरगी येथे वृक्षलागवड, जलसंवर्धन उपक्रमाचा शुभारंभ |पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्ष जगवाचा संदेश; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

बसरगी येथे वृक्षलागवड, जलसंवर्धन उपक्रमाचा शुभारंभ |पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्ष जगवाचा संदेश; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     भूजल पातळी वाढविणे, पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बसरगी येथे वृक्ष संवर्धन व जलसंवर्धन जनजागृती कार्यक्रम २०२६ उत्साहात पार पडला.
     सुजलोन फांऊंडेशन, पुणे यांच्या सीएसआर निधीतून ‘सुअक्षयजल’ प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, बीआईआरडी सामाजिक संस्था या प्रकल्पाची अंमलबजावणी भागीदार आहे. जत तालुक्यातील १२ गावांमध्ये भूजल पुनर्भरण, जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
     बसरगी येथे या उपक्रमांतर्गत वृक्षलागवड, जलतारा खड्डे आणि छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या रेनवॉटर हार्वेस्टिंग कामांचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
     यावेळी सरपंच शिवाप्पा तावशी, सुजलोनचे अधिकारी अतुल गोरे, शरद पाटील, संदेश शिंदे, सुग्रीव शिंदे, अभियंता दिगंबर बामणे, कृषी अधिकारी दत्ता माळी, कामगार संघटना जिल्हाप्रमुख अशोक पाटील आदी उपस्थित होते.
     ग्रामपंचायत अधिकारी बी. बी. खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर, शिक्षक, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, नर्स तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले, तर सुग्रीव शिंदे यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाचे उद्दिष्ट व जलसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले.
     या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि वृक्ष जगवा’ हा संदेश देण्यात आला. पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरविल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.