जत | प्रतिनिधी;
राजे रामराव महाविद्यालय, जत येथे प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने "ॲनिमल ऑफ द वीक" या शैक्षणिक नवोपक्रमाचे उद् घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा रानगर यांच्या हस्ते तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.रामदास बनसोडे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.मल्लाप्पा सज्जन, डॉ.संगीता देशमुख, डॉ.ललिता सपताळ, गणितशास्त्र विभागप्रमुख प्रा.वैभव चांदवले व वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रारंभी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मल्लापा उर्फ प्रकाश सज्जन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य कृष्णा रानगर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता आपल्या सभोवतालच्या प्राणिजगताचे निरीक्षण करावे, त्यामागील शास्त्रीय माहिती समजून घ्यावी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे सांगून त्यांनी
"ॲनिमल ऑफ द वीक" या उपक्रमांतर्गत दर आठवड्याला एका प्राण्याची निवड करून त्याच्याविषयी शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्राण्यांविषयी कुतूहल, निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जैवविविधतेची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी विभाग प्रमुख डॉ.मल्लाप्पा सज्जन या नवोपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, ॲनिमल ऑफ द वीक या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक सोमवारी एका प्राण्यांची माहिती देऊन त्यांची वैशिष्ट्ये, अधिवास, आहार, वर्तन, पर्यावरणीय महत्त्व तसेच जैवविविधता संवर्धन याबाबत माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या नवोपक्रमांमुळे प्राण्यांविषयी माहिती जाणून घेण्यास मदत मिळणार असून पर्यावरणीस संरक्षणास मदत होणार आहे.
यावेळी बी.एससी भाग दोन प्राणीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु.वैशाली गुरव हिने "रंग बदलणारा सरडा" या प्राण्याबद्दल माहिती देऊन जैव साखळीत असणारे सरड्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ललीता सपताळ यांनी तर आभार डॉ.संगीता देशमुख यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवोपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

