yuva MAharashtra बोलण्यापेक्षा लेखणी अधिक प्रभावी असते म्हणून लेखाणाची आवड जोपासावी; प्राचार्य कृष्णा रानगर

बोलण्यापेक्षा लेखणी अधिक प्रभावी असते म्हणून लेखाणाची आवड जोपासावी; प्राचार्य कृष्णा रानगर

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ;
      कविता ही केवळ चार ओळींची रचना नसून समाजातील वास्तव, माणुसकी, समानता, पर्यावरण, आणि सामाजिक प्रश्न यांसारख्या विविध विषयांवर विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. बोलण्यापेक्षा लेखणी अधिक प्रभावी असते म्हणून विद्यार्थ्यांनी लेखनाची आवड जोपासावी आणि आपल्या लेखणीतून समाजप्रबोधन करावे,असे प्रतिपादन प्राचार्य कृष्णा रानगर यांनी केले.
       ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि लेखनकौशल्याला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'श्रावणसरी" या भित्तिपत्रिकेच्या उद् घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ हे होते. प्रारंभी प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात भित्तिपत्रिका आयोजित करण्यामागील उद्देश सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
       प्राचार्य कृष्णा रानगर यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, पावसाळा हा ऋतु हिरवाई, निसर्ग आणि नवचैतन्याशी जोडलेला आहे. निसर्गातील विविध अनुभव, आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संवेदनशील प्रतिबिंब कवितेतून व्यक्त करता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या आकलनशक्तीला व बुद्धीला चालना देऊन मनातील विचारांना कवितेच्या माध्यमातून शब्दरूप द्यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
       यावेळी डॉ.शिवाजी कुलाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा साहित्यिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करुन चिकित्सक विचार आणि संस्कार यांचा समन्वय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.कुमार इंगळे, प्रा.रेश्मा लवटे मॅडम व मराठी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी तर आभार विभाग प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानले. हि भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी प्रा.रेश्मा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.