जत तालुक्याला आजवर या मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा दावा; निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार
जत | प्रतिनिधी :
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून प्रकाश व्हनमाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना व्हनमाणे म्हणाले की, जत तालुक्याला आजपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून प्रतिनिधित्व मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील बँकेच्या सभासद मतदारांचा आपल्या उमेदवारीला पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण जिल्ह्यातील सभासदांशी संपर्क साधून निवडणूक लढविण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आपण निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून, सभासद मतदार आपल्याला पसंती देतील, असा विश्वास व्हनमाणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश माने व संचालक मंडळ उपस्थित होते.

