जत | प्रतिनिधी :
मी १५ वर्षे सीमेवर दुश्मनाच्या गोळीला घाबरलो नाही, मग तुम्ही शिकलेले भावी डॉक्टर एका साध्या स्वाक्षरीला का घाबरता? उठा आणि माहिती अधिकाराचा वापर करा, असा परखड सवाल माजी सैनिक तथा सहाय्यक जनमाहिती अधिकारी सिद्धू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केला. जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक महाविद्यालयात महसूल विभाग व पंचायत समिती, जत यांच्या वतीने आयोजित माहिती अधिकार जनजागृती अभियानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा प्रथम अपिलीय अधिकारी प्रविण धानोरकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेच्या कामकाजाची माहिती करून घेण्याचे आवाहन केले. “भावी डॉक्टरांनो, तुम्ही केवळ दवाखान्यात बसू नका. वेळोवेळी तहसील, पंचायत समितीसारख्या शासकीय कार्यालयांना भेटी द्या. माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळवा आणि प्रशासन कसे चालते, हे समजून घ्या,” असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी अविनाश पाटील यांनी ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर कसा करता येतो, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माजी सैनिक सिद्धू आप्पा शिंदे यांचे मार्गदर्शन ठरले. त्यांनी माहिती अधिकार अधिनियमातील विविध तरतुदी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. कलम ३ म्हणजे नागरिकांचा माहिती मिळविण्याचा हक्क, कलम ६ अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया, कलम ७ नुसार माहिती देण्याची मुदत आणि कलम २० अंतर्गत दंडाची तरतूद, याबाबत त्यांनी माहिती दिली. “ही चार कलमे नसून तुमच्या हातातील चार हत्यारे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी माहिती अधिकाराचा अर्ज कसा तयार करावा, तो कोणाकडे सादर करावा, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कृष्णा बामणे यांनी माहिती अधिकाराच्या वापराबाबतचे आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप भोसले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मान्यवरांचे आभार मानले. तहसीलदार, गटविकास अधिकारी, माजी सैनिक सिद्धू आप्पा शिंदे, माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत चौगुले, कृष्णा बामणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानास महाविद्यालयातील ३०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. माहिती अधिकाराचा कायदा केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

