yuva MAharashtra नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जत वार्ता न्यूज
By -

जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २ मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत; पुस्तक, गणवेश वितरणासह विविध उपक्रम

जत | प्रतिनिधी ;
     नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जत शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ येथे प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
     शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, टाळ्यांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने कुंकवाच्या पाऊलखुणांनी स्वागत करण्यात आले. फेटा परिधान करून आलेल्या चिमुकल्यांनी प्रवेशोत्सवात विशेष आकर्षण निर्माण केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचेही वितरण करण्यात आले.
     कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. जत विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले.
     जत विधानसभा मतदारसंघात सुमारे १८ हजारांहून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमातून, ८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी कन्नड माध्यमातून तर सुमारे ३०० विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जत शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत असून ही संख्या राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले.
     कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, तहसीलदार प्रवीण धानोरकर, गटविकास अधिकारी मरे, गटशिक्षण अधिकारी फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, नगरसेवक इमरान गवंडी, मुख्याध्यापक कोडक सर, मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, संतोष देवकर, भाऊसाहेब दुधाळ, प्रकाश मोटे, अनिल पाटील यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
     नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दर्जेदार शिक्षण, आवश्यक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.