राजे रामराव महाविद्यालयात लीड कॉलेज अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
व्यक्तिमत्व विकासामध्ये प्रभावी संभाषणाची कौशल्ये अत्यंत महत्त्वाची असून, ती वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली आहेत. अलीकडील चर्चा आणि तज्ञांच्या मते, स्पष्ट संवाद, आत्मविश्वासाने बोलणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे हे चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, संघर्ष टाळण्यासाठी आणि एकूणच जीवनात आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांगोला येथील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. मनोजकुमार माने यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग, लीड कॉलेज व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
अधिक बोलताना ते म्हणाले, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, केवळ ज्ञानापेक्षा ते ज्ञान प्रभावीपणे व्यक्त करणे जास्त महत्त्वाचे आहे. संवाद कौशल्ये ही एक अशी कला आहे, जी शिकून आणि सराव करून कोणीही आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवू शकते. हे कौशल्य विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते.
या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रामदास बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके तर आभार डॉ. लक्ष्मण भरगंडे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेस लीड कॉलेजचे समन्वयक प्रा. आशिष घोडके, प्रा. देवयानी करे यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

