जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण निवड सभेत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकमताने पार पडल्या. या सभेत भाजपाचे विक्रम ताड यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचबरोबर भाजपकडून परशुराम मोरे तर काँग्रेसकडून महादेव कोळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या सर्व निवडी पूर्ण करण्यात आल्या.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक विजयी केले होते. त्यानंतर अपक्षातून निवडून आलेले फिरोज नदाफ यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ १२ झाले आहे. त्यामुळे नगरपरिषदेत भाजपची सत्ता अधिक भक्कम झाली आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे ८ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. आज झालेल्या सभेत भाजप व काँग्रेसकडून प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आला.
उपनगराध्यक्षपदी निवड झालेले विक्रम ताड हे पक्षासाठी सातत्याने काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेले परशुराम मोरे (भाजप) आणि महादेव कोळी (काँग्रेस) हेही आपल्या पक्षांशी प्रामाणिक राहून कार्य करणारे नेते म्हणून शहरात परिचित आहेत. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांना नगरसेवक म्हणून संधी देण्यात आल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडी हे विषय अजेंड्यावर असताना भाजपाच्या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. मात्र काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक निवडीस स्थगिती मिळावी, यासाठी पत्र देण्यात आले. नगरपरिषद नियमांनुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड ही याच सभेत होणे अपेक्षित असल्याने भाजप नगरसेवक गौतम ऐवाळे व मिथुन भिसे यांनी नियमाप्रमाणे पहिल्या क्रमांकाच्या अर्जदाराचा अर्ज वैध धरून महादेव कोळी यांची निवड जाहीर करण्याची ठाम मागणी लावून धरली.
या मागणीनंतर नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी व मुख्याधिकारी यांनी नियमांचा आधार घेत महादेव कोळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर केली. काँग्रेसकडून कोळी यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी तो प्रयत्न हाणून पाडल्याचे ऐवाळे व भिसे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे या पहिल्याच निवड सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून भाजपला पाठिंबा देण्यात आल्याने नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे अधिक स्पष्ट झाली असून आगामी काळात भाजपकडून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

