जतवार्ता न्यूज नेटवर्क;
डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून ॲड. सौ. राजश्री अमोल पांढरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. कोणताही गाजावाजा, शक्तीप्रदर्शन किंवा मिरवणूक न करता अत्यंत साध्या व शांत पद्धतीने त्यांनी हा अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा होत आहे.
सामान्य जनतेशी थेट संवाद साधत, विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमेचे राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना भास्कर कोळी यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. साधेपणा आणि प्रामाणिकपणा हेच आपले बलस्थान असल्याचे यावेळी त्यांनी अधोरेखित केले.
मतदार संघाचा चौफेर विकास हे ध्येय उराशी बाळगून या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उच्चविद्याविभूषित उमेदवार ॲड. सौ. राजश्री पांढरे यांनी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. कायद्याचे सखोल ज्ञान आणि सामाजिक कार्याचा अनुभव याच्या जोरावर त्या मतदार संघातील प्रश्न प्रभावीपणे मांडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साधी राहणी, स्पष्ट विचार आणि विकासाचा ठोस आराखडा यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. पक्षीय राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारी ही उमेदवारी डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघाच्या निवडणुकीत कितपत प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

