जतवार्ता न्यूज नेटवर्क;
शेगांव पंचायत समिती गणातून वाळेखिंडी सर्व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तसेच वाळेखिंडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी (दादा) शिवाजी शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर केला. त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. अर्ज दाखल करतेवेळी नितीन इनामदार, सखाराम पोळ, किसान टेंगले आदीजन उपस्थित होते.
तानाजी (दादा) शिंदे यांनी वाळेखिंडी सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी सलग दहा वर्षे यशस्वीपणे सांभाळली आहे. या कालावधीत शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून सोसायटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्यांनी केले. पारदर्शक कारभार, सर्वसमावेशक निर्णयप्रक्रिया आणि लोकाभिमुख नेतृत्व यामुळे त्यांची ओळख कार्यक्षम व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.
तसेच वाळेखिंडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही सक्रिय असून गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या कुटुंबीयांचीही सार्वजनिक सेवेची परंपरा असून त्यांच्या पत्नी अनिता शिंदे यांनी पाच वर्षे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात महिलांचे प्रश्न, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला.
कोरोना महामारीच्या कठीण काळात तानाजी (दादा) शिंदे यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवत असंख्य नागरिकांची मदत केली. गरजू कुटुंबांना अन्नधान्य, औषधे, आरोग्यविषयक मदत तसेच प्रशासनाशी समन्वय साधून लोकांची कामे मार्गी लावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. याशिवाय २०१९ च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत त्यांनी आपल्या भागात मोफत पाणी वाटपाचा उपक्रम राबवून शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा दिला. अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची प्रतिमा लोकसेवक म्हणून अधिक दृढ झाली आहे.
या सर्व कामगिरीच्या जोरावर तानाजी (दादा) शिंदे यांच्या उमेदवारीला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनुभव, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली थेट नाळ यामुळे शेगांव पंचायत समिती गणात ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

