जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील बनाळी गावच्या हद्दीतील कोकरे वस्तीवर ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून, हा मृत्यू आत्महत्या की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. मल्हारी भाऊसो कोकरे (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी कोकरे हा आपल्या नातेवाईकांसह गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकरे वस्तीवर वास्तव्यास होता. गुरुवारी दुपारी तो घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. मित्राकडे गेला असावा, असा अंदाज बांधून कुटुंबीयांनी शोध न घेता रात्री झोप घेतली.
शुक्रवारी सकाळी मल्हारी याच्या चुलत्याच्या शेतातील घरालगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच तात्काळ जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, मल्हारीवर खासगी सावकारांचे तसेच सोसायटीचे कर्ज होते. खासगी सावकारांकडून तगादा सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन आणि खिशातील पाकीट आढळून न आल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी सदर घटनेची नोंद प्राथमिक स्वरूपात आत्महत्या अशी केली असून, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सर्व शक्यता तपासून अधिक तपास जत पोलीस करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
