जतवार्ता न्यूज नेटवर्क;
शेगाव पंचायत समिती गणातून शेगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत शिवाजी शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून युवकांच्या प्रश्नांपासून ते ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत शिवसेना शिंदे गटाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधत, पंचायत समिती स्तरावर शेगाव गणाचा सर्वांगीण विकास करणे, शेतकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उमेदवारीमुळे शेगाव पंचायत समिती गणातील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

