yuva MAharashtra जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून सावित्री रवीपाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून सावित्री रवीपाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटामधून माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्या सौभाग्यवती सौ. सावित्री तम्मनगौडा रवीपाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरीत्या दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जाडरबोबलाद गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे.
     माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी आपल्या कार्यकाळात विकासाभिमुख कामे, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला व युवकांसाठी विविध उपक्रम राबवून जनतेत विश्वास निर्माण केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सौ. सावित्री रवीपाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
     सौ. सावित्री रवीपाटील या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. गावागावातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. विकासाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करूनच आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी अर्ज दाखल करताना सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
     दरम्यान, जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे असून विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सौ. सावित्री रवीपाटील यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.