जतवार्ता न्यूज नेटवर्क;
बनाळी जिल्हा परिषद गटातून अचकनहळ्ळी गावचे माजी सरपंच व जत सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रमोद सावंत यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सावंत समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी विविध कार्यकर्ते, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रियेसंबंधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सावंत यांनी आपली उमेदवारी दाखल केली.
प्रमोद सावंत यांनी अचकनहळ्ळी गावचे सरपंच म्हणून कार्यकाळात राबविलेल्या विविध विकासकामांमुळे त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे. तसेच जत सोसायटीचे विद्यमान चेअरमन म्हणून त्यांनी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य घटकांसाठी केलेल्या कामाची दखल घेतली जाते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सावंत म्हणाले की, “बनाळी गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणे हे माझे ध्येय आहे. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढविणार आहे.”
प्रमोद सावंत यांच्या उमेदवारीमुळे बनाळी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

