yuva MAharashtra दरीबडची जि. प. गटातून सरदार पाटील यांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल

दरीबडची जि. प. गटातून सरदार पाटील यांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून दरीबडची जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी आज अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे दरीबड गटातील राजकीय समीकरणे तापण्यास सुरुवात झाली आहे.
     सरदार पाटील हे अनुभवी, अभ्यासू आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दरीबड व परिसरातील पाणीप्रश्न, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकरी प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे विविध समाजघटकांमध्ये त्यांना चांगला जनसमर्थन असल्याचे चित्र आहे.
     दरम्यान, सरदार पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात असून, त्यांच्या अर्ज दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नेतृत्वाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा असून, पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यास दरीबड गटात निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
     दरीबडची जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, येथे विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. मात्र सरदार पाटील यांचा अनुभव, कामाचा लेखाजोखा आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे ते मजबूत दावेदार मानले जात आहेत.
     आगामी काही दिवसांत उमेदवारी निश्चिती झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार असून, दरीबडची गटातील निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.