संख जिल्हा परिषद गटातून जत पंचायत समितीचे माजी सभापती मा. आर. के. पाटील यांच्या स्नुषा सौ. कविता किरण पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला. यावेळी किरण पाटील, गुरुबसव पाटील, विजय बिरादार, अजय बिरादार, तम्मा बागेळी, रेखा बागेळी तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना संख, जत तालुका व परिसरातून आलेल्या महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मोठ्या जल्लोषात हा अर्ज दाखल करण्यात आल्याने संख जिल्हा परिषद गटातील निवडणुकीची रंगत वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे.
मा. आर. के. पाटील हे जत पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागात आर. के. पाटील कुटुंबीयांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असून शैक्षणिक संस्था व शिक्षणविषयक उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे.
सौ. कविता किरण पाटील या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, शिक्षण व ग्रामीण विकास या विषयांवर त्यांचा विशेष भर राहिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेतून जनतेच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार करत “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली.
या प्रसंगी भाजपचे तालुका व जिल्हा पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, शिक्षक, शेतकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संख जिल्हा परिषद गटातील ही भाजपची उमेदवारी आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असून सौ. कविता किरण पाटील यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


